औरंगाबाद: शिवसेनेचा बालेकिल्ला मध्य मतदारसंघ हातातून गेल्याने शिवसैनिक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. यावेळी हा मतदारसंघ युवा सेनेला सोडवून घेण्यासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव देण्याची तयारी युवा सैनिकांनी केली असल्याचे समजते.
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा सध्या उत्तर महाराष्ट्रात सुरू आहे. या यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत युवासेना महत्त्वाची भूमिका बजावेल यात शंका नाही. दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांना थेट मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणूनच प्रोजेक्ट केले असल्याने युवा सैनिकात जोश निर्माण झाला आहे. शिवसेनेत आदित्यचे महत्त्व वाढत असल्याचे लक्षात येताच युवा सेना कमालीची सक्रिय झाली. जिल्ह्यातील युवा सैनिक आदित्य ठाकरे यांच्या जन आशिर्वाद यात्रेची प्रतीक्षा करीत आहेत. या यात्रेची जोरदार तयारी युवा सैनिकांनी सुरू केली आहे. यानिमित्ताने मध्य मतदारसंघातून युवासेनेला उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव ठाकरेंसमोर ठेवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहराचे हृदय समजल्या जाणार्या मध्य मतदार संघावर एमआयएमचा झेंडा आहे. गेल्यावेळी माजी आमदार प्रदीप जैस्वाल- किशनचंद तनवाणी यांच्या वादात ही जागा एमआयएमने बळकावली होती. तेव्हापासून शिवसेनेत खदखद आहे. या वेळी कोणत्याही परिस्थितीत मध्यवर भगवा झेंडा फडकवायचाच या इरेला युवासैनिक पेटल्याचे दिसते. युवा सेनेचे राज्य प्रतिनिधी राजेंद्र जंजाळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर त्यांचे युवा सैनिकही जणू इरेलाच पेटल्याचे दिसते. गेल्या दोन वर्षांपासून जंजाळ यांनी मध्य मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. गतवर्षी झालेल्या दंगलीत जंजाळ यांना अटकही झाली होती, त्याचा मोठा लाभ जंजाळ यांना होईल असे दिसते. दुसरीकडे युती झाल्याने भाजपमधील काही मातब्बर मंडळी सेनेत प्रवेशासाठी आतूर झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर तिकिटासाठी सेनेत प्रवेश करायला एक मोठा नेता तयार असल्याचे बोलले जाते. त्याचा प्रवेश रोखण्यासाठी युवा सैनिकांनी गेल्या आठवडाभरात मातोश्रीच्या वार्याही केल्या. यावेळी युती असल्याने मध्य मतदार संघातून सेनेला विजयाची संधी दिसू लागली आहे.
आदित्य समोर ठेवणार प्रस्ताव
दरम्यान, एक दोन आठवड्यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा मराठवाड्यात होईल, असे संकेत मिळत आहेत. या यात्रेची संपूर्ण जबाबदारी युवा सेनेवर असल्याने युवा सैनिकात सध्या जोश आहे. याचाच फायदा घेत मध्य मतदार संघासाठी युवासैनिक सेटिंग करण्याच्या विचारात असल्याचे समजते. मध्यबाबत बारीकसारीक राजकीय घडामोडी आदित्य यांच्या कानावर घालून युवा सेनेसाठी वातावरण कसे अनुकूल आहे, ही बाबही ठाकरेंच्या गळी उतरविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.